बुलेट ट्रेनच्या कामासाठी एमएमआरडीए मैदान पाच वर्षे बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर पुढील पाच वर्षे कोणताही कार्यक्रम होणार नाही. प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी हे मैदान येत्या मार्चपासून बंद केले जाणार आहे. लवकरच तिथे बुलेट ट्रेनसाठी खोदकामाला सुरुवात केली जाणार आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडोर लिमिटेडमधील (एमएचएसआरसीएल) सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून एमएमआरडीए मैदानावर खोदकाम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ते मैदान कोणालाही देता येणार नाही, असे एमएचएसआरसीएलच्या सूत्रांनी सांगितले.

एमएमआरडीए मैदान राजकीय पक्षांच्या सभांबरोबरच प्रदर्शने व अन्य मोठय़ा कार्यक्रमांसाठी भाडय़ाने दिले जाते. हे मैदान आकाराने मोठे असून तिथे वाहने पार्क करण्याचीही सुविधा आहे. 2014मध्ये या मैदानावर 75पेक्षा जास्त राजकीय कार्यक्रम झाले होते. त्यासाठी आकारण्यात आलेल्या भाडय़ातून एमएमआरडीएला 14.24 कोटी रुपये मिळाले होते. त्या वर्षी दोन निवडणुका झाल्या होत्या.

सध्या या मैदानाचा काही भाग विविध प्रकल्पांसाठी देण्यात आला आहे. मेट्रो-2बी आणि मेट्रो-3 प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डचे काम तिथे सुरू आहे. हे दोन्ही मार्ग वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जोडले जाणार आहेत. मैदानाचा पाच एकरचा परिसर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रासाठी राखून ठेवला गेला आहे.