मदत करणाऱ्या तरूणाला दगडाने मारहाण; टोळक्याने तीन मोटारींच्या काचा फोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी घसरून पडलेल्या तरुणाला मोटारीतून उतरून मदत करणाऱ्यालाच टोळक्याने दगडाने मारहाण केली आहे.  त्यानंतर कोयत्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडून परिसरातील इतर दोन मोटारींचे नुकसान केल्याची घटना फुरसुंगीतील गंगानगर रिक्षा स्टॅड परिसरात घडली. सुरज परमेश्वर खरात (वय 19, रा. हडपसर) , आकाश रघुनाथ यादव (वय 19, रा. आळंदी रस्ता, भोसरी), रोहित राम सुनेवाड (वय 19, रा. गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषीकेश दानवले (वय 26, रा. ढमाळवाडी, हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार ऋषीकेश आणि त्यांचा मावसभाऊ 1 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मोटारीतून जात होते. त्यावेळी गंगानगर परिसरात सुरजची दुचाकी घसरल्याने तो खाली पडला. त्याला उठविण्यासाठी ऋषीकेशने मदत केली असता, तिन्ही आरोपींनी मिळून त्यांना दगडाने मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडीत कोयत्याने ऋषीकेश यांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले. त्याशिवाय परिसरातील दोन मोटारीच्या काचा फोडत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. राऊत तपास करीत आहेत.