
पीएमपीएल बससह इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत टोळीचा गुन्हे शाखेच्या पथक एकने पर्दापाश केला आहे. त्यांच्याकडून 3 लाख 62 हजारांचे 30 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
इम्रान उर्फ लखन मुनिरूजामल मंडल (वय – 28, रा. बिबवेवाडी, मूळ-पश्चिम बंगाल) काल्या उर्फ शामा धोत्रे (रा. बुधवार पेठ, पुणे) चोरीचे मोबाईल विकत घेणारा दुकानदार शाहरूख मोहम्मद शेख (वय – 19, रा. कोंढवा रोड) आणि अभिषेक मुन्नालाल कसोटे (वय – 21, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारा एकजण मोबाइल विक्रीसाठी महानगरपालिकेजवळ येणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार योगेश जगताप आणि प्रशांत गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून इम्रानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार काल्यासह शहरातील विविध भागातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 26 मोबाईल जप्त करण्यात आले. दोघांकडून चोरीचे मोबाईल विकत घेणारा दुकानदार शाहरूखला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याशिवाय बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईताला रास्ता पेठ परिसरात अटक करण्यात आले. अभिषेक कसोटे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले. त्याच्याविरूद्ध मुंढवा पोलीस ठाण्यातंर्गत गंभीर दुखापत, खुनाची धमकी देणे, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, योगेश जगताप, विजेसिंग वसावे, सतीश भालेराव, प्रशांत गायकवाड, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर, अशोक माने, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.

































































