
प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या एक आणि दोन पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रूपये किमतीचे 16 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कृष्णा नारायणा सातपाडी (वय 33, रा. आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शिवाजीनगरमध्ये एक संशयित मोबाईलचोर थांबल्याची माहिती पोलीस नाईक मोहसीन शेख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कृष्णा सातपाडी याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 63 हजार रूपये किमतीचे 6 मोबाईल जप्त करण्यात आले. त्याने हडपसर, शिवाजीनगर, वानवडी, फरासखाना परिसरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, अस्लम पठाण, मोहसीन शेख, उत्तम तारू, चेतन गोरे, समीर पटेल यांच्या पथकाने केली.
दुसऱ्या घटनेत गुन्हे शाखेच्या युनीट एकने मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीनासह दोघा सराईतांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 26 हजार रूपये किमतीचे 10 मोबाइल जप्त केले आहेत. अतिश हंसराज माने (वय 21, रा. जनता वसाहत, पर्वती ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, संतोष क्षीरसागर, दीपक मते, एकनाथ कंधारे, मच्छिंद्र वाळके, रामदास गोणते, हनुमंत गायकवाड, संदीप तळेकर, सुजीत पवार, सोनम नेवसे यांच्या पथकाने केली.































































