मोदी सरकार इतिहासातून धडा घेत नाही! ओवेसींनी कश्मीरमधील हत्यांवरून केंद्राला केलं लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱ्यात कश्मीरी पंडित आणि हिंदूंना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीरमधील हिंदूंमध्ये तणाव आणि भितीचं वातावरण आहे. यासंदर्भात देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. सर्वच नेते या घटनेचा निषेध करत आहेत. असं असतानाच मोदी सरकारच्या धोरणांवर देखील जोरदार टीका केली जात आहे. एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कश्मीरमधील सध्याच्या परिस्थिकतीला मोदी सरकारलाच जबाबदार ठरवलं आहे. तसेच इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती सुरू असल्याचेही ओवेसी म्हणाले आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मोदी सरकार इतिहासातून धडा घेत नाही. 1989 मध्ये जी चूक झाली होती तशीच चूक सरकार करत आहे. 1989 मध्येही राजकीय आउटलेट बंद करण्यात आले आणि खोऱ्यातील (कश्मीर) राजकारण्यांना बोलू दिले गेले नाही. ते तीच चूक करत आहेत.’

‘1987 च्या निवडणुकीत हेराफेरी झाली होती आणि त्याचा परिणाम 1989 मध्ये दिसला… ते कश्मिरी पंडितांना मनुष्य म्हणून नव्हे तर निवडणुकीचा मुद्दा म्हणून पाहतात. ते स्थानिक राजकारण्यांना बोलू देत नाहीत. अशा गोष्टी दहशतवादाला वाव देत आहेत. त्याची जबाबदारी मोदी सरकारवर आहे, मी त्याचा निषेध करतो’, असंही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.