पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आखात आणि युरोपमधील पाच देशांचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून हिंदुस्थानात परतले. या दौऱ्यामध्ये त्यांनी या देशांसोबत विविध करार केले आहेत. हिंदुस्थानने युरोपियन महासंघासोबत व्यापार करार केला होता. त्यानंतर हिंदुस्थानची जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा महत्त्वपूर्ण होता. या दौऱ्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त करार केले आहेत.

मोदी यांच्या दौऱ्याची संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीने सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट दिली. भारताने एलपीजीचा दीर्घकालीन पुरवठा आणि सामरिक पेट्रोलियम साठे मजबूत करण्यासाठी यूएईसोबत 7 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली. नेदरलँड्स आणि स्वीडन या देशांसोबत एआय, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि हरित हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रांवर महत्त्वाचे करार करण्यात आले. नॉर्वेसोबतही तेल, वायू पुरवठ्यासंदर्भात करार केले.

वादाची किनार

मोदींच्या या दौऱ्याला वादाची किनार होती. नॉर्वेमध्ये महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देताच मोदी निघून गेल्यामुळे हिंदुस्थानात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत जगभरात चर्चा सुरू झाली, तर इटली दौऱ्यात त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘मेलोडी’ चॉकलेट भेट म्हणून दिल्यावरून देशभरात मोदींवर टीका करण्यात आली.