ऑक्टोबरपासून मोनो रेल ट्रकवर

37

सामना ऑनलाईन | मुंबई

पावसाळय़ात ट्रकवर पाणी साचल्याने लोकल ठप्प पडते. चाकरमान्यांना कार्यालयात पोहचण्यास उशीर होतो किंवा मग दांडीच होते. त्यामुळे अनेकांना प्रतीक्षा आहे ती वरून धावणाऱया मोनो रेलची. येत्या ऑक्टोबरमध्ये ती प्रतीक्षा संपणार आहे. ऑक्टोबरपासून मोनो रेल पुन्हा ट्रकवर येणार असून वर्षअखेरपर्यंत वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पाही सुरू होणार आहे.

गेल्या वर्षी म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनो रेलला आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हापासून मोनो रेलची सेवा बंद आहे. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रत्येक स्थानकाची पाहणी केल्यानंतर मोनो पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला. मात्र आगीच्या घटनेनंतर मोनोची सेवा चालवण्याची जबाबदारी ‘स्कोमी इंजिनीयरिंग’ कंपनीकडेच द्यायची की नाही यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) थोडे संभ्रमात होते.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मोनो चालवावी असा एमएमआरडीएचा प्रयत्न होता, परंतु एमआरव्हीसीकडून अद्याप काहीच प्रतिसाद न आल्याने मोनोच्या चाव्या ‘स्कोमी इंजिनीअरिंग’कडेच दिल्या जातील अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. रिलायन्सही त्यासाठी इच्छुक होती, परंतु मोनो चालवण्यास रिलायन्सने मागितलेला मोबदला एमएमआरडीएला परवडणारा नव्हता.

येत्या ऑक्टोबरपासून मोनो रेल्वेचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा सुरू करण्याची स्कोमी इंजिनीअरिंगची योजना आहे. मोनो रेलचे डबेही स्कोमी इंजिनीअरिंगनेच बनवले आहेत. मुंबईत एकूण १० मोनो रेल सेवेत आणल्या जाणार होत्या. नोव्हेंबर २०१७ मध्ये आगीची घटना घडण्यापूर्वी त्यातील ५ गाडय़ा सेवेत होत्या. आता उर्वरित ५ गाडय़ाही स्कोमीकडून लवकरच मुंबईत आणल्या जातील. फेब्रुवारी २०१९ पर्यंत मोनोची संपूर्ण सेवा सुरळीत होईल असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या