Rain Alert – परतीच्या पावसाने टेन्शन वाढवलं! मेघगर्जनेसह वादळाची पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

परतीच्या पावसाने देशभरात थैमान घातले आहे. राज्यातील अनेक परिसरात पूरस्थिती आहे. पुराच्या पाण्यात अनेक संसार आणि शेती वाहून गेली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेत वाढ करणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे पावसाचा मुक्काम आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे 28 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 28 सप्टेंबरला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.