नाशिक जिह्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिह्यातील बहुतांश भागात आज पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. नाशिकसह सिन्नरमध्ये दुपारी काहीवेळ वादळामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात अनेक घरांचे पत्रे उडाले, तसेच कांदा चाळी, पोल्ट्री शेड यांचेही मोठे नुकसान झाले.

सप्तशृंग गड व परिसरात दुपारी दीड तास मुसळधार पाऊस झाला, येथे अधिकमास व उन्हाळी सुट्टय़ांमुळे भाविकांची गर्दी होती. पावसाने भाविकांसह व्यापाऱयांची मोठी तारांबळ उडविली. नाशिक शहर व परिसरात सायंकाळी ५ वाजता पाच ते दहा मिनीटे मध्यम सरी बरसल्या. इगतपुरी व नांदगाव तालुक्यात दुपारी वादळी वाऱयासह अर्धा तास दमदार पाऊस झाला. मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल व काही भागात, तसेच सिन्नर, चांदवड, सटाणा, निफाडच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

पाच जनावरांचा मृत्यू
येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे तीन जनावरे मृत्युमुखी पडली, तर सिन्नरच्या देवपूरमध्ये एक वासरू व एक बैल यांचा मृत्यू झाला.

शेतकरी जखमी
निफाड तालुक्यातील पोळगाव येथे वादळी वाऱयामुळे घराचे पत्रे उडाल्याने हिरण गवळी हा शेतकरी जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१३५हून अधिक घरांची पडझड
येवला तालुक्यात शुक्रवारी रात्री डोंगरगाव, आडगाव, चोथवे, कानडी, नगरसूल, बोकटे, देवळाणे, दुगलगाव, गवंडगाव, रास्ते सुरेगाव या भागात वादळी वाऱयामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. डोंगरगाव, बोकटे, कानडी येथे अनुक्रमे राजाराम सोमासे, पोपट घायवट व रवींद्र कुदळे यांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले. गारखेडय़ामध्ये घराची भिंत कोसळली. ममदापूरला अण्णा मुंढे यांच्या पोल्ट्री शेडचे, तर बोकटे येथे प्रताप दाभाडे यांच्या शेडनेटचे नुकसान झाले. निफाडमधील ब्राह्मणवाडेत घरांची पडझड झाली. सिन्नर तालुक्यातील शहा गावी ३२ घरे, दोन कांदा चाळी व ग्रामपंचायत सभागृह; देवपूरला २१ घरे, ४ पोल्ट्री शेड; वावीत २६ घरे; नांदूरशिंगोटेत २२ घरे, ४ कांदा चाळी; पांढुर्लीत १५ घरे, १४ गोठे आणि ७ शेडनेट यांचे मोठे नुकसान झाले आहे.