पावसाच्या हिंदुस्थान दौऱ्याला केरळपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

उकाड्याचे सरकार घालवण्यासाठी पावसाने कंबर कसली असून आजपासून त्याचा हिंदुस्थान दौरा सुरू झाला आहे. पुढचे चार महिने पाऊस देशभरात फिरणार असून उकाड्याचे राज्य घालवण्यासाठी त्याने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. गर्मीने आणि दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करण्याचा एककलमी कार्यक्रम पावसाने हाती घेतला आहे.

हवामान विभागाने केरळमध्ये पाऊस दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पावसाचं आगमन झालं असलं तरी यंदा पाऊस समाधानकारक नसेल असं खासगी हवामान संस्था स्कायमेटने म्हटले आहे. हवामान विभागानेही सरासरीपेक्षा पाऊस कमी असेल असं म्हटलं आहे. मान्सूनपूर्व पाऊसही सरासरीपेक्षा कमी राहील. गेल्या ६५ वर्षांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस कमी होण्याची ही दुसरी वेळ असेल. सामान्यपणे मान्सूनपूर्व पाऊस १३१.५ मिलीमीटर होतो. मात्र, यावर्षी हा पाऊस ९९ मिलीमीटर पडला. मान्सून आगमन क्षेत्रात अल-नीनो सक्रीय झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, असे स्कायमेटच्या समर चौधरी यांनी म्हटले आहे.

 

मान्सूनने गेल्या दोन दिवसांत आणखी प्रगती करत श्रीलंकेचा निम्मा भाग व्यापला होता. दक्षिण हिंदुस्थानात हवेच्या मधल्या थरात वाऱ्याचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार झाले असून शनिवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची महाराष्ट्राकडील वाटचाल निश्चित होणार आहे.

देशात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा  कमी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याचा हा अंदाज चुकावा आणि राज्यात भरपूर पाऊस पडावा अशी प्रार्थना राज्यातील प्रत्येकजण करत आहे.