
पहिल्याच पावसात मुंबईची पार दाणादाण उडवणारा पाऊस जूनमध्येही धुमाकूळ घालणार आहे. कारण मान्सून एक्स्प्रेस जोरात असून जूनमध्ये देशभरात सरासरीच्या तब्बल 108 टक्के अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने आज मान्सून हंगामातील सुधारित अंदाज जारी केला. यंदा मराठवाडा आणि विदर्भावरही वरुणराजा प्रसन्न असून येथील शेतकऱयांसाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीच्या 106 टक्के अधिक पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत 87 सेमी पाऊस पडू शकतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंज मोहापात्रा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुधारित अंदाजाबाबत माहिती दिली.

























































