
मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अँटॉप हिलमधील मशिदी तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांकडून ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन होत आहे. याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला द्या, अशी विनंती करीत वडाळा येथील 70 वर्षीय महेंद्र सप्रे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर 12 जूनला सुनावणी निश्चित केली आहे.
वडाळा येथील बंगालीपुरा झोपडपट्टी भागात निर्धारित वेळेच्या पलीकडे अजान तसेच मोठय़ा आवाजात संगीत वाजवले जात आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र त्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावा करीत सप्रे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांनी अॅड. प्रेरक चौधरी यांच्यामार्फत दाखल केलेल्या रिट याचिकेची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. माटुंगा पूर्व येथील शांतता क्षेत्र असलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) कॅम्पसमध्येही ध्वनी प्रदूषण नियमावलीचे काटेकोर पालन केले जात नाही. विशिष्ट मर्यादेबाहेरील मोठय़ा आवाजाचा वृद्ध रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच हृदयविकार, अन्य गंभीर व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांच्या जीविताला धोका संभावत आहे, असे म्हणणे अॅड. चौधरी यांनी न्यायालयात मांडले. मुंबई पोलीस आणि महापालिका प्रदूषण नियंत्रण रोखण्यात आणि ध्वनिक्षेपकासाठी दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात अपयशी ठरल्याचा दावा सप्रे यांनी केला आहे.






























































