संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा हटवली, मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयावर काँग्रेस नेते नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या सुरक्षेवरून राडा सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमध्येच या गोष्टीवरून दोन गट पडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजधानी भोपाळ येथील आरएसएस मुख्यालयाची सुरक्षा हटवण्याचे आदेश दिले होते. परंतु ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत पुन्हा सुरक्षा देण्यासंबंधी ट्वीट केले होते. यानंतर कमलनाथ यांनी ‘यू टर्न’ घेत पुन्हा एकदा आरएसएस मुख्यालयाचा सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.

सोमवारी रात्री कमलनाथ सरकारने भोपाळमधील आरएसएस मुख्यालयाची सुरक्षा हवटण्याचे आदेश दिले होते. मध्यरात्री घेतलेल्या या निर्णयानंतर सुरक्षा हटवण्यास सुरुवातही झाली होती. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या दृष्टीने आरएसएसच्या या मुख्यालयाचे विशेष महत्व आहे. परंतु कमलनाथ सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना सुरक्षा हटवण्याचे आदेश दिले. तसेच एका तक्रारीनंतर व निवडणूक कार्यासाठी सुरक्षादलाची आवश्यकता असल्याने हे पाऊल उचलल्याने कमलनाथ यांनी म्हटले होते. परंतु ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त करत सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा पूर्वव्रत करण्याची मागणी केली.

दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली होती. भोपाळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची सुरक्षा हटवणे योग्य नाही. मी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे सुरक्षा पुन्हा पूर्वव्रत करण्याची मागणी करतो, असे ट्वीट दिग्विजय सिंह यांनी केले होते. या ट्वीटनंतर कमलनाथ सरकारने आपला निर्णय मागे घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आमचे वैचारिक मतभेद असून शकतात परंतु त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा हटवणे योग्य नाही. तसेच आरएसएस कार्यालयातील ज्येष्ठ लोक म्हणताहेत की आम्ही सुरक्षा मागवली नाही, परंतु तरीही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हे पुन्हा सुरक्षाव्यवस्था पूर्वव्रत करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.