एमपीएससी परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या ताणतणावामुळे तसेच बिकट आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी 4.30 वाजता फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा.गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. स्वप्नीलचे आई-वडील बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यांची मुलगी दुपारी 4.30 वाजता घरी आली. तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिला दिसले. या घटनेबाबत तिने आई-वडीलांना कळवले. तसेच त्याला रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषीत केले.

स्वप्नील शिक्षण पूर्ण झाल्यापासून एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो एमपीएससीच्या 2019 च्या पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.