… तर आयपीएलनंतर धोनी ‘या’ मोठया स्पर्धेत खेळताना दिसणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी सध्या यूएईमध्ये आयपीएल 2020 स्पर्धा खेळत आहे. तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला यंदा धोनीच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईचा संघ सध्या तळाशी असून जवळपास स्पर्धेतून बाहेर गेल्यात जमा आहे.

आयपीएल संपल्यानंतर धोनी बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. याबाबत एका ऑस्ट्रेलियन वेबसाईटने वृत्त दिले असून धोनीसह सुरेश रैना आणि युवराज सिंह देखील बिग बॅशमध्ये खेळताना दिसू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेल्या या तिन्ही विस्फोटक खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायजीमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

ऑस्ट्रेलियाच्या cricket.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॅश लीग स्पर्धेत आता अंतिम 11 खेळाडूत 2 ऐवजी 3 विदेशी खेळाडूंना स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे फ्रेंचायजीची नजर विदेशी खेळाडूंवर आहे. सुरेश रैना, धोनी, युवराज या अनुभवी आणि विस्फोटक खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रेंचायजी उत्सुक असून त्यांना चांगली ब्रँड व्हॅल्यू देखील मिळण्याची शक्यता आहे.

बीसीआयची परवानगी आवश्यक

दरम्यान, बिग बॅश लीग डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे, तसेच तो आयपीएलचा हिस्सा नाही. त्यामुळे तो थेट ही लीग खेळू शकतो.

मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले धोनी आणि रैना अद्याप आयपीएलचा भाग आहेत. त्यामुळे नियमानुसार त्यांना ही लीग खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या