
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
एखाद्या खेळात अधिक सामने खेळले म्हणून त्या खेळाडूला त्या खेळाचे अधिक ज्ञान असते हा समाज पार चुकीचा आहे. कारण जगभरातील अनेक क्रिकेट प्रशासक हे अधिक कसोटी अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या देशांनी खेळात चमकदार यश मिळवले आहे. त्यामुळे बीसीसीआयचे पाच राष्ट्रीय निवड समिती सदस्य मिळून एकूण 13 कसोटी खेळले आहेत या निकषावर त्यांचे अवमूल्यन करणे योग्य ठरणार नाही, असा टोला बीसीसीआय राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी त्यांच्यावर बोचरी टीका करणाऱ्या माजी कसोटीपटूंना लगावला आहे. प्रसाद यांचा अप्रत्यक्ष रोख विश्वचषकातील संघाचे खापर निवड समितीवर फोडणारे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्याकडे होता.
सुनील गावसकर यांनी यंदाच्या विश्वचषकातील टीम इंडियाच्या अपयशाबद्दल राष्ट्रीय निवड समितीच्या चुकीच्या निर्णयांना जबाबदार धरले. शिवाय या अपयशाची कारणमीमांसा करताना प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला ‘लेम डक’ (लंगडे बदक) अशा शब्दांत हिणवले होते. गावसकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रसाद यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींसमोर आपले मनोगत उघड केले. प्रसाद म्हणाले, कसोटी अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतींच्या अनुभवावर क्रिकेट प्रशासकांचे यशापयश अवलंबून नसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले माजी निवड समिती अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर एक नामवंत क्रिकेट प्रशासक होते. शिवाय केवळ एक कसोटी लढत खेळणारे इंग्लंडचे विद्यमान बोर्ड प्रमुख एड स्मिथ, ऑस्ट्रेलियाकडून केवळ सात कसोटी सामने खेळणारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे अध्क्ष ट्रेव्हर होन्स गेली 12 वर्षे समर्थपणे आपले काम करीत आहेत.
गावसकर यांच्या मताशी मी असहमत – संजय मांजरेकर
माजी कर्णधार सुनील गावसकर हे महान क्रिकेटर आहेत. त्यांचा पूर्ण आदर ठेवूनच मी त्यांच्या मतांबाबत माझी भूमिका मांडतोय. विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली असे मला वाटत नाही. आपला संघ स्पर्धेतील सात लढती जिंकला आणि उपांत्य लढतीत आपल्याला निसटता पराभव पत्करावा लागला, पण या अपयशाचे खापर कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अथवा राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्यावर फोडणे योग्य ठरणार नाही, असे परखड मत टीम इंडियाचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकर याने व्यक्त केले आहे.
तीन वर्षांत टीम इंडियाला चमकदार यश
बीसीसीआय निवड समिती म्हणून मी आणि माझे चार सहकारी देशातील क्रिकेटच्या भल्यासाठीच काम करीत आहोत असे सांगून प्रसाद म्हणाले, गेल्या तीन वर्षांत जागतिक क्रिकेट क्षेत्रातील टीम इंडियाची प्रगती शानदारच झाली आहे. संघाने
13 पैकी 11 कसोटी मालिका जिंकून कसोटी आयसीसी मानांकनात आपले नंबर वन स्थान कायम राखले आहे. विश्वचषकातील उपांत्य फेरीतील अपयशापर्यंत टीम इंडिया वन डेत टॉपवरच होता. आपले वन डे क्रिकेटमधील यश 80 ते 85 टक्के आहे. शिवाय आपल्या संघाने दोन आशिया चषक (2016 आणि 2018) जिंकण्याचा पराक्रम केला आहे. संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम लढतींपर्यंत पोचला होता. हिंदुस्थानी ‘अ’ संघाने 11 पैकी 11 वन डे मालिका आणि 9 पैकी 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तरीही आमचा पाणउतारा ‘लेम डक’ असे हिणवून केला जातोय याचेच अधिक दुःख होतेय, असेही प्रसाद शेवटी म्हणाले.




























































