दक्षिण मुंबईत आज गढूळ पाणी; काळजी घेण्याचे जल विभागाचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीचे काम लवकरच होणार असल्यामुळे तज्ञांच्या समितीकडून होणारी तपासणी आज पूर्ण झाली. या तपासणीसाठी जलाशयाचा कप्पा क्र. 1 रिकामा करून पुन्हा नव्याने भरण्यात आला. यामुळे या जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ‘ए’ विभाग पर्ह्ट, सी – मुंबई सेंट्रल आणि डी विभाग ग्रँट रोडमध्ये उद्या 19 डिसेंबर रोजी गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पालिकेकडून मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी विचाराधीन आहे. त्यामुळे आय.आय.टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीने मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक-1ची आज पाहणी करण्यात आली. या तज्ञ समितीने सकाळी 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत या 2 तासांच्या कालावधीत जलाशयाची अंतर्गत पाहणी केली. तज्ञ समितीच्या भेटीचा शेवटचा टप्पा आज पार पडला. या काळात जलाशयाचा कप्पा रिक्त करण्यात आल्याने मुंबईत काही परिसरात पाणीकपात करण्यात आली.

फक्त किरकोळ दुरुस्तीची गरज
दरम्यान, आजच्या पाहणीनंतर संपूर्ण जलाशयाची पाहणी पूर्ण झाली असून फक्त तुरळक ठिकाणी काँक्रिटचा काही भाग नादुरुस्त झाला आहे. हे काम अत्यंत कमी आहे. संपूर्ण जलाशय चांगल्या अवस्थेत आहे. 135 वर्षांपूर्वी झालेले काम अजूनही मजबूत आहे. त्यामुळे जलाशयाची किरकोळ दुरुस्ती आवश्यक असल्याची माहिती तज्ञ समितीमधील आयआयटी तज्ञांकडून देण्यात आली.