अंबानी यांना खंडणीसाठी धमकीचे दोन ई-मेल, 200 कोटी द्या अन्यथा दडेथ वॉरंटवर स्वाक्षरी झालेली आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी धमकीचा ई-मेल करणाऱयाने आज पुन्हा दुसरा मेल केला आहे. 20 कोटी द्या, अन्यथा जिवे मारू, आमच्याकडे इंडियातले बेस्ट शूटर्स आहेत असा शुक्रवारी रात्री मेल करण्यात आला होता, पण तुम्ही पहिल्या मेलला प्रतिसाद दिलेला नाही. आता 200 कोटी द्या, अन्यथा तुमच्या मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी झालेली आहे, असे दुसऱया मेलद्वारे धमकावण्यात आल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात येते.

शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शादाब खान नावाच्या व्यक्तीच्या नावाने मुकेश अंबानी यांच्या ई-मेलवर धमकीचा मेल आला होता. जर तुम्ही 20 कोटी नाही दिले तर आम्ही तुम्हाला ठार मारू, आमच्याकडे इंडियातले बेस्ट शूटर्स आहेत, असे मेलद्वारे अंबानी यांना धमकावण्यात आले. हा धमकीचा मेल आल्यानंतर अंबानी यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ उडाली. या धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत अंबानी यांच्या ऍन्टेलिया या निवासी टॉवरमध्ये सुरक्षाप्रमुख म्हणून काम करणारे देवेंद्र मुन्शीराम (50) यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात अंबानी यांना 20 कोटींच्या खंडणीसाठी धमकीचा ई-मेल करणाऱया अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असताना आज संध्याकाळी पुन्हा धमकीचा दुसरा मेल अंबानी यांना पाठविण्यात आल्याचे समजते. तुम्ही पहिल्या मेलचे उत्तर दिले नाही. आता 200 कोटी द्या, अन्यथा तुमच्या मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी झालेली आहे, असे दुसऱया मेलद्वारे धमकावण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.