
मुंबईत गोवरचा प्रसार वाढतच असून दिवसभरात 38 गोवर संशयित आढळले असून दहा जणांमध्ये गोवरचे निदान झाले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा 472 वर तर संशयितांचा आकडा 9467 वर पोहोचला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विशेषतः मुंबई महानगर परिसरासह मालेगाव, भिवंडी, पिंपरी चिंचवड, पनवेल, रायगड, जळगाव, धुळे आदी ठिकाणी गोवर रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई-महानगर क्षेत्रात गोवरमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून संशयितांना ‘अ’ जिवनसत्वच्या गोळय़ांचे वाटप करण्यात येत असून बाधितांवर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत.
मुंबईत 15 जण ऑक्सिजनवर
मुंबईत सद्यस्थितीत 15 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर दोन जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 46 जण सध्या रुग्णालयात दाखल असून आज 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, मुंबईत पालिकेकडून आतापर्यंत 8377214 घरांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना, जनजागृती करण्यात येत आहे.
लसीकरणाने गोवर टाळता येतो
विषाणूजन्य गोवर आजार लसीकरणामुळे टाळता येतो. हा आजार मुख्यत्वेकरून पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱयावर आणि नंतर संपूर्ण शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, कर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंध्यत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून राज्यभरात जनजागृती, लसीकरण आणि संशयित-बाधितांवर आवश्यक उपचार केले जात आहेत.




























































