
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता आरोग्यतज्ञांकडून व्यक्त केली गेली असतानाच आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील 12 वर्षांखालील चार मुलांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून 12 ते 18 वर्षांपर्यंतच्या 12 मुले आणि 6 कर्मचाऱयांवर भायखळ्याच्या रिचर्डसन ऍण्ड क्रुडासमधील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हे तिसऱया लाटेचे संकेत मानले जात आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जात असून त्यातून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन मुले काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ई विभागाकडून या अनाथाश्रमात राहणाऱया सर्वांसाठी मंगळवारी आरोग्य चाचणी शिबीर राबवण्यात आले. या चाचणीत 16 मुलांना आणि 6 कर्मचाऱयांना कोरोना झाल्याचे आढळले. दरम्यान, हा अनाथाश्रम मुंबई महापालिकेने सील केला आहे.
मुंबईत पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मुलांमध्ये कोरोना आढळला आहे. जी मुले निगेटिव्ह आली आहेत त्यांना अनाथाश्रमातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून पालिका त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. त्याचबरोबर दर दोन दिवसांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जाणार आहे.
– मनीष वळंजू, साहाय्यक आयुक्त, ई विभाग
मुंबईत कोरोनाचे दररोजचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असताना कांदिवलीतील वीणासंगीत सोसायटीत कोरोनाचे 6 रुग्ण सापडले आहेत. गेल्या महिनाभरापासून या सोसायटीत एकूण 14 जणांना कोरोनाची लागण झाली, मात्र त्यातील 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सोसायटी सील करण्यात आली असून सर्व रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.
कांदिवली पश्चिमेतील वीणासंगीत या 100 कुटुंबे असलेल्या सोसायटीत गेल्या महिन्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर मुंबई महापालिकेने तिथे आरोग्य शिबीर घेतले. शिबीर घेतल्यानंतर तिथे रुग्ण सापडू लागले. गेल्या महिनाभरात या सोसायटीत एकूण 14 रुग्ण सापडले असून ही इमारत सील करण्यात आली आहे. रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूर्ण इमारत पुन्हा सॅनिटाईज करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱयाने दिली.
n मुंबईत कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मुंबईत सध्या दररोज 30 ते 40 हजार कोरोना चाचण्या होत असल्या तरी कोरोनाचे रुग्ण मात्र 300 च्या आत सापडत आहेत.
डेल्टाचा एकही रुग्ण नाही
आठवडाभरात इमारतीत एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. शिवाय या सर्व रुग्णांचे डेल्टासाठी नमुने पाठवले होते, मात्र आतापर्यंत या सोसायटीत डेल्टाचा एकही रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती आर-दक्षिणच्या आरोग्य अधिकारी डॉ. नाजनीन खान यांनी दिली.




























































