
मुंबई शहर व उपनगरांत महिनाभर गुलाबी थंडीचा मुक्काम कायम असतानाच प्रदूषित हवेने मुंबईकरांची डोकेदुखी वाढवली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक वारंवार ढासळत आहे. शुक्रवारीही हा निर्देशांक 344च्या ‘अत्यंत खराब’ पातळीवर गेला होता. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळाले असून पालिका-सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत सर्दी-खोकला तसेच घशाचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतीच आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीने मुक्काम ठोकला आहे. किमान तापमानाचा पारा 15-16 अंशांच्या नीचांकी पातळीवर राहिला आहे. तापमानातील ही घसरण मुंबईकर एन्जॉय करीत आहे. याचदरम्यान शहराची हवा रोगट बनल्याने मोठय़ा प्रमाणावर नागरिक आजारी पडू लागले आहेत. यापूर्वी प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर होती, मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईच्या प्रदूषित हवेने दिल्लीपेक्षा खराब पातळी गाठली आहे. शहर आणि उपनगरांत सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, तापमानात झालेली मोठी घट, वाऱ्याचा मंदावलेला वेग अशा विविध कारणांमुळे मुंबईची हवा अत्यंत खराब स्थितीत पोहोचली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात येत्या 28 जानेवारीपासून ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा परिणाम होऊन किमान तापमान आणखी कमी होऊ शकते. काही भागांत तापमानात लक्षणीय घट होईल, असे हवामानतज्ञांनी म्हटले आहे. प्रदूषण तसेच वातावरणात अचानक होत असलेला विचित्र बदल यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईचा हवा गुणवत्ता
निर्देशांक (एक्यूआय)
कुलाबा 215 (खराब)
माझगाव 225 (खराब)
वरळी 186 (मध्यम)
चेंबूर 344 (अत्यंत खराब)
भांडुप 283 (खराब)
नवी मुंबई 334 (अत्यंत खराब)