रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे सरकला! एमएमआरटीएच्या बैठकीत वाढीव दराचा फैसला होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात स्कूल बसची भाडेवाढ जाहीर होताच सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम म्हणून रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. रिक्षाची भाडेवाढ करण्यासंदर्भात मुंबई रिक्षामेन्स युनियनने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) निवेदन दिले असून त्याला अनुसरून अंधेरी आरटीओने प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण अर्थात एमएमआरटीएच्या येत्या बैठकीत अंतिम फैसला होणार आहे. त्यानुसार लवकरच रिक्षा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत.

देशात पेट्रोल-डिझेलची लागोपाठ दरवाढ होऊन इंधनाचे भाव गगनाला भिडल्यानंतर सर्वच क्षेत्रांत दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. अलीकडेच सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने आता ऑटो रिक्षा आणि टॅक्सींच्या भाडेवाढीचे संकट उभे ठाकले आहे. जुन्या दराने ऑटो रिक्षाची सेवा देणे परवडत नसल्याचे म्हणणे मांडत मुंबई रिक्षामेन्स युनियनने अंधेरी आरटीओला निवेदन दिले. त्यावर पुढील कार्यवाहीसाठी आरटीओने ऑटो रिक्षाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव ताडदेव आरटीओकडे सादर केला आहे. ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) हे एमएमआरटीएचे सचिव असल्याने त्यांच्यामार्फत एमएमआरटीएच्या येत्या बैठकीत भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. बैठकीत चर्चा करून भाडेवाढीचा अंतिम फैसला जाहीर होणार असल्यामुळे ऑटो रिक्षाची भाडेवाढ अटळ मानली जात आहे. त्यामुळे उपनगरातील सामान्य प्रवासी आणि नोकरदारांचा रिक्षा प्रवास महागणार आहे.

1 जुलैपासून  किमान भाडे 27 रुपये होणार

मुंबई रिक्षामेन्स युनियनने त्यांच्या स्तरावरील भाडेदरवाढ गणना केल्याचा तक्ता आरटीओकडे सादर केला आहे. त्या भाडेदरवाढ गणनेनुसार 50 पैसे वाढ होत असल्याने 26 रुपयांवरून 27 रुपये किमान भाडे 1 जुलैपासून लागू करावे, अशी मागणी रिक्षा चालकांच्या संघटनेने केली आहे. त्यावर प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केल्यास किमान भाडे 27 रुपये लागू होणार आहे.

सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांना जुन्या दराने रिक्षा चालवणे मुश्किल बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आरटीओला भाडेवाढ लागू करण्यासाठी विनंती केली आहे.

तंबी कुरियन, सरचिटणीस, मुंबई रिक्षामेन्स युनियन