
मुंबई सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मिंधे सरकारच्या दबावाखाली तब्बल 1700 कोटींची कामे करण्यात येत असताना चांगली कामेही तोडून नव्याने केली जात असल्याचे गंभीर प्रकारही समोर येत आहेत. यामध्ये वांद्रय़ात केसी मार्गावरील चांगल्या स्थितीत असणारे आणि अलीकडेच रंगकाम केलेले शोभिवंत झाडे असलेले रस्त्यावरचे डिव्हायडर तोडले जात आहेत. याबाबतचा व्हिडीओ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला आहे. घटनाबाह्य सरकारच्या दबावाखाली मुंबईकरांच्या हक्काच्या 1700 कोटींचा चुराडा असाच करणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून सौंदर्यीकरणाची 500 कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचे श्रेय लाटण्यासाठी मिंधे सरकारच्या माध्यमातून पालिकेने दोन वेळा भूमिपूजनाचा घाट घातला होता. तर आता चांगली कामेही तोडून नव्याने केली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 2021मध्ये हे डिव्हायडर दुरुस्त करण्यात आले होते. सद्यस्थितीत ते मजबूत आणि झाडे असल्याने, रंगकाम केल्याने सुशोभित दिसत होते. मात्र ते आता तोडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सौंदर्यीकरणाची अर्धी कामे डिसेंबरअखेरपर्यंत करण्याचे उद्दिष्टय़ पालिकेकडून ठेवण्यात आले होते. तर उर्वरित कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबरअखेरपर्यंत तर यातील 25 टक्के कामेही झाली नव्हती. मात्र पंतप्रधानांच्या दौऱयासाठी ही कामे घाईगडबडीत केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तर आता उद्दिष्टय़ साध्य करण्यासाठी चांगली कामे तोडली जात असल्याचे बोलले जात आहे.

































































