बेस्टची डबलडेकर नव्या रूपात येणार, 100 डबलडेकर बसेसची लवकरच खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या आवडत्या डबलडेकर एकामागून एक सेवेतून काढल्या जात असल्याने नाराज होण्याची काही गरज नाही! कारण बेस्टच्या या डबलडेकर बसेसची जागा लवकरच अत्याधुनिक डबलडेकर घेणार आहेत. मुंबईची शान असलेल्या 100 डबलडेकर बसेसची लवकरच खरेदी करण्यात येणार आहेत.

मुंबईतील बेस्टच्या डबलडेकर बसेसची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांना चुटपुट लागली आहे. एकेकाळी बेस्टच्या ताफ्यात 120 डबलडेकर बसेस होत्या. साधारण 15 वर्षे सेवा बजाविल्यानंतर या डबलडेकरची देखभाल करणे खर्चिक होत असल्याने तिला मोडीत काढले जाते. आता बेस्टच्या ताफ्यात केवळ 51 डबलडेकर शिल्लक आहेत. त्यापैकी 10 बसेस या महिन्यात भंगारात निघणार आहेत. त्यामुळे केवळ 41 डबलडेकर बस बेस्टकडे शिल्लक राहणार आहेत.

बेस्टकडे येणार 100 डबलडेकर

बेस्टने नोव्हेंबर 2020 मध्ये आधुनिक 100 डबलडेकर बससाठी निविदा काढली आहे. या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून एक ऐवजी दोन दरवाजे, दोन जिने, सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. नवीन डबलडेकर बसमध्ये दोन्ही बाजूस दरवाजे असून ते स्वयंचलित असतील. बस आणि प्रवासी सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरेही असणार आहेत. या बस ‘भारत-6’ श्रेणी इंजिनाच्या असून त्यात स्वयंचलित गिअर असतील, अशी माहिती वाहतूक विभागातील अधिकाऱयांनी दिली आहे.