
दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. मुलांना घरून ऑनलाईन अभ्यास करावा लागत आहे. शाळेतील अभ्यास, वर्गातील धम्माल मुलं ‘मिस’ करत आहेत. डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा भरतेय आणि मुलांना गुगलवर हजेरी लावावी लागत आहे. शाळादेखील मुलांना ‘मिस’ करत आहे. याच संकल्पनेवर आधारित एक खास प्रासंगिक गीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीने तयार केलेय. फळा आणि खडू लागलेत रडू, विचारत आहेत प्रश्न शाळा कधी सुरू… महापालिका शाळांतील मुलांच्या आवाजात या गाण्याचे रेकॉर्डिंग आणि शूटिंग करण्यात आले आहे. या गाण्याला खूप चांगली दाद मिळत आहे.
मुलांना ‘डिजिटली’ संगीत शिकवण्यासाठी महानगरपालिकेचा संगीत कला अकादमी विभाग नवनवीन शक्कल लढवताना दिसत आहे. मागील काही महिन्यांत विभागातर्फे अनेक संगीत व्हिडियो तयार करण्यात आले आहेत. सध्याच्या काळात व्हिडियो बघून मुलांनी संगीत आत्मसात करावे, हा यामागील उद्देश आहे. जून महिना म्हणजे शाळांची सुरुवात असून यंदा शिक्षकांना प्रत्यक्ष मुलांना भेटून शिकवता येत नाही. त्यामुळेच ‘फळा आणि खडू’ हे प्रासंगिक गीत संगीत अकादमीने तयार केले आहे. संगीत शिक्षकांना ‘तंत्रस्नेही’ करण्याचा उद्देशही अशा व्हिडिओ निर्मितीतून साधला जात आहे.
फळा आणि खडू हे गीत प्रफुल मस्के, तनुजा हिवाळे, भाग्यशाली मोघा, प्रतीक्षा पाईकराव, श्रेय चौगुले या विद्यार्थ्यांनी गायले आहे. ही मुले आरे कॉलनी शाळा आणि शिक शिक्षण संस्था, सायन येथे शिकतात. संगीत प्राचार्या सुवर्णगौरी घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली गीत साकारण्यात आले आहे. अभिनय नृत्य दिग्दर्शन रेश्मा खानोलकर, संगीत दिग्दर्शन विनय चौगुले आणि संगीत संयोजन सिद्धांत जाधव तर चित्रीकरण संकलन मयांक खानोलकर यांनी केले आहे. सिद्धांत जाधव हा आरे कॉलनी पालिका शाळेचा माजी विद्यार्थी आहे. चारुहास दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने संगीत शिक्षण घेतले असून आज तो संगीत क्षेत्रात करियर करत आहे.
संगीत ही प्रत्यक्ष गुरूच्या सान्निध्यात शिकण्याची परंपरा. सध्या कोरोनाच्या संकटामुळे मुले आमच्यापासून दूर आहेत. या परिस्थितीत त्यांना प्रभावीपणे शिकवण्यासाठी आमची टीम प्रयत्न करत आहे. त्यासाठी आकर्षक व्हिडियो आम्ही तयार करत आहोत. संगीत, नृत्य या आमच्या विषयांतून मुलांकरील ताणतणाव कमी करण्याचा सांघिक प्रयत्न संगीत अकादमी तर्फे केला जात आहे. – सुवर्णगौरी घैसास, प्राचार्या, संगीत अकादमी
काही दिवसांपूर्वीच सोलापूरच्या एका तरुणाने इंस्टाग्राम ऍपमधील त्रुटी शोधली होती. त्यामुळे फेसबुवने त्याला 22 लाख रुपयांचे बक्षीस दिले होते. असाच प्रकार आता दिल्लीतदेखील घडला आहे. दिल्लीच्या एका 20 वर्षीय तरुणीने मायक्रोसॉफ्टमधील त्रुटी शोधली असून कंपनीने तिला तब्बल 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
























































