मुंबईतील रस्त्यांची भुयारे होणार नाहीत!

विविध कारणांसाठी रस्ते खोदल्याने होणारी रस्त्यांची दुर्दशा रोखण्यासाठी आता महत्त्वाच्या रस्त्यांमध्ये येणाऱया टेलिफोन, केबल आणि इतर उपयोगिता वाहिन्या जमिनीखालून नेण्याचा महत्त्वाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी पालिका सल्लागार नेमणार असून संबंधित रस्त्यांच्या दुरुस्ती-बांधणीनंतर हमी कालावधी पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त मजबूत रस्ते मिळणार आहेत.

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून अनेक रस्ते बांधण्यात येतात. मात्र पालिका क्षेत्रात नागरी सुविधा पुरवण्यासाठी व बाह्य उपयोगिता सेवासंस्थांकडून रस्ते खोदले जातात. पालिकेला नाहक टीकेला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेने रस्त्यांवर होणारे खोदकाम टाळण्यासाठी उपयोगिता वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीचे सर्व रस्त्यांसाठी हा उपक्रम आहे.

पहिल्या टप्प्यात या रस्त्यांचे काम होणार

पालिकेने हाती घेतलेल्या उपक्रमात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या कामात पी डीमेलो रोड, वाळेकेश्वर मार्ग, बेलासिस रोड, सेनापती बापट मार्ग, जुहू-वर्सोवा लिंक रोड, कार्टर रोड, एसव्ही रोड आणि लिंक रोड मालाड आदी महत्त्वाच्या रस्त्यांच्या समावेश आहे.

सल्लागाराची जबाबदारी

  • प्रस्तावित रस्त्याची प्राथमिक तपासणी करून सर्वेक्षण करणे
  • सद्यस्थितीत असलेल्या उपयोगिता सेवांचे जाळ्याची चाचणी
  • कामांसाठी मानांकनानुसार अंदाजपत्रक, आराखडे, रेखाचित्र बनवणे
  • मुंबईत भविष्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आराखडे संकल्पचित्र बनवणे
आपली प्रतिक्रिया द्या