
सामना प्रतिनिधी । मुंबई
सीबीएसईप्रमाणे बारावी सायन्सच्या पेपरपॅटर्नमध्ये केलेला बदल राज्यातील विद्यार्थ्यांना भारी पडला असून या नव्या पेपरपॅटर्नमुळेच विद्यार्थ्यांच्या गुणांना कात्री लागल्याचे मत नामांकित कॉलेजमधील सायन्स शाखेचे प्राध्यापक व्यक्त करीत आहेत. आधीच्या एकूण 70 गुणांच्या पेपरपॅटर्नमध्ये 14 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न (objective type) होते. पण बदललेल्या पेपरपॅटर्नमध्ये फक्त 4 गुणांचेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. तसेच प्रश्नपत्रिकेतील एकूण 27 प्रश्नांपैकी केवळ तीन प्रश्नांनाच पर्यायी प्रश्न विचारले होते.
बारावी सायन्स शाखेचा निकाल यंदा 3.25 टक्क्यांनी घसरला आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने इंजिनीयरिंग किंवा मेडिकलला जाणारे विद्यार्थीही अपात्र ठरले आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळण्याचे खापर मुंबईतील काही प्राध्यापकांनी बदललेल्या पेपरपॅटर्नवर फोडले. पूर्वी विद्यार्थ्यांना विचारलेल्या तीन किंवा चार पैकी दोन प्रश्न सोडवा, असे पर्याय उपलब्ध होते. पण आता पर्यायी प्रश्नच प्रश्नपत्रिकेतून गायब झाले आहेत. प्रश्नपत्रिकेतील जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचेच असल्याने विद्यार्थ्यांसाठी पेपर सोडविणे जड झाले आहे.
विद्यार्थ्यांना ‘दीर्घोत्तरी’ प्रश्न जड
जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमुळे बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यात हातखंडा असलेले विद्यार्थी दीर्घोत्तरी प्रश्न लिहिण्यात अपयशी ठरत आहेत, असे मत मुंबईतील फिजीक्सचे प्राध्यापक हेमंत शिंदे यांनी व्यक्त केले. एचएससी बोर्डाने सीबीएसईच्या धर्तीवर यंदा अभ्यासक्रम बदलला खरा, पण सीबीएसई बोर्डानेही यंदा त्यांच्या अभ्यासक्रमात बदल करून पुन्हा बहुपर्यायी पेपरपॅटर्न आणला. त्यामुळे यंदा सीबीएसईचा बारावीचा निकालही वाढला. सीबीएसईप्रमाणे आता पुढील वर्षी राज्य मंडळ पुन्हा बारावीचा पेपरपॅटर्न बदलणार का, असा सवाल प्राध्यापक विचारत आहेत.
पुनर्मूल्यांकन, गुण पडताळणीसाठी साडेतीन हजार अर्ज
तीन दिवसांत पुनर्मूल्यांकन आणि गुण पडताळणीसाठी तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून यातील सर्वाधिक विद्यार्थी हे सायन्स शाखेचे आहेत, असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणीसाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेऊन तपासलेली उत्तरपत्रिका नीट पाहावी मगच निर्णय घ्यावा, असे आवाहनही खंडागळे यांनी केले. आज तिसऱया दिवशी सुमारे दीड हजार अर्ज आले आहेत.






























































