अंधेरीच्या ‘केंब्रिज’मधील अडीच हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचले

60

सामना प्रतिनिधी। मुंबई

फायर सेफ्टी नसल्याचे कारण देत पालिकेने 4 जुलैपासून बंद केलेली अंधेरीची केंब्रिज शाळा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत शिवसेना शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शाळेत तातडीने फायर सेफ्टी यंत्रणा सज्ज करण्याची कार्यवाही पूर्ण करावी आणि शाळा तातडीने सुरू करावी असे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. यामुळे शाळेतील अडीच हजार विद्यार्थी आणि 200 शिक्षक-कर्मचाऱयांचे भवितव्य वाचले आहे.

अंधेरी जे. बी. नगर येथे बॉम्बे केंब्रिज शाळा 26 वर्षांपासून सुरू आहे. या शाळेने आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याने अग्निशमन दलाने नोटीस दिली होती. 30 दिवसांत शाळेने आग प्रतिबंधक नियमांची पूर्तता करण्यास सांगितले होते, मात्र अग्निशमन नियमांची पूर्तता करण्याआधीच अग्निशमन दलाने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शाळा बंद केली आहे. त्यामुळे ऐन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. पालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक कारवाईविरोधात गेल्या पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यानंतर शिवसेना शिष्टमंडळाने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचीही भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, नगरसेविका राजूल पटेल, समन्वयक कमलेश राय, नितीन डिचोलकर, मनोहर पांचाळ आदी उपस्थित होते.

…तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
पालिका प्रशासनाच्या दंडेलशाहीविरोधात गेल्या पाच दिवांपासून संबंधित शाळेत शिवसेनेकडून धरणे आंदोलन सुरू आहे. संबंधित शाळा प्रशासनाने केलेल्या नियमांच्या उल्लंघनाचा नाहक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आमदार ऍड. अनिल परब यांनी सांगितले. यावेळी लवकरच शाळा सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, शिवसेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम असून जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या