आणखी दोन पोलीस झाले शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या विळख्यात आता पोलीस सापडत आहेत. मुंबई पोलीस दलातील सर जे. जे. मार्ग आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कोरोनाने शहीद झाले. गेल्या 24 तासांत दोन पोलीस शहीद झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने कोविड योद्धे असलेले मुंबई पोलीस हे रस्त्यावर तैनात आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव पोलीस दलावर दिसू लागला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस हे कोरोनाने शहीद झाले. सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुभाष जाधव यांची गेल्या आठवडय़ात कोविड चाचणी केली गेली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी दुपारी त्याचे सेव्हन हिल्स रुग्णालयात निधन झाले.

तर चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश सुरवसे यांचे आज कोरोनाने निधन झाले. सुरवसे यांची गेल्याच आठवडय़ात कोरोना चाचणी केली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले होते. पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना राधास्वामी रुग्णालयात दाखल केले. सहा दिवस उपचारानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुरवसे यांच्यावर तुर्भे येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही पोलिसांच्या निधनाने मुंबई पोलीस दलातील कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलिसांची संख्या आता 105 झाली आहे.