
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत तपासणी झालेल्या 190 ‘कोरोना’ संशयित रुग्णांपैकी 188 जणांचे ब्लड रिपोर्ट ‘कोरोना निगेटिव्ह’ आले आहेत, तर दोन ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आज पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबई विमानतळावर 18 जानेवारीपासून आतापर्यंत पालिका, विमानतळ प्रशासन आणि राज्य सरकारच्या डॉक्टरांच्या टीमकडून 1 लाख 96 हजार 762 जणांची तपासणी झाल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुंबईकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरू नये, पण काळजी घ्यावी असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने मुंबईत शिरकाव केल्याचे समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारतही आहे, मात्र सोशल मीडिया आणि अफवांमुळे नागरिकांमध्ये ‘कोरोना’ची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी ‘कोरोना’बाबत पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि संशयित रुग्णांबाबतची माहिती दिली. आतापर्यंत केवळ दोन कोरोना संशयितांचे ब्लड रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांचीही प्रकृती सुधारत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यामध्ये शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा, हात स्वच्छ धुवावेत, डोळ्यांशी हातांचा जास्त संपर्क येऊ देऊ नये अशी दक्षता घ्यावी असे त्या म्हणाल्या. सर्वांनी सरसकट मास्क वापरायची गरज नसून ज्यांना लक्षणे आढळतील त्यांनी प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरावे, असेही त्या म्हणाल्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गाइडलाइननुसारच पालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना, उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
संशय, शंका असल्यास 1916 वर डॉक्टरला विचारा!
विषाणू प्रजातीमधील ‘कोरोना’ची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनालाही त्रास होतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत पाच दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर जवळचा डॉक्टर किंवा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय पालिकेच्या ‘1916’ या क्रमांकावर संपर्क करावा, या ठिकाणी तज्ञ डॉक्टरकडून संशय, शंकांचे निरसन केले जाईल असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही सेवा 24 तास सुरू आहे.
पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज
- कस्तुरबा रुग्णालयातील बेडची संख्या 50 करण्यात आली असून ती 100 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
- विमानतळावर 45 डॉक्टर आणि सहाय्यक मेडिकल स्टाफच्या माध्यमातून तपासणी सुरू.
- कस्तुरबा रुग्णालयात खास कोरोना ओपीडी, कोरोना चाचणी सुरू.
- पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील 300 डॉक्टर्स-स्टाफला ट्रेनिंग दिले. अजूनही ट्रेनिंग सुरू.
- सेव्हन हिल्स रुग्णालयात 400 खाटांची व्यवस्था. खासगी रुग्णालयांमध्ये ट्रेनिंगसाठी सेमिनार.































































