
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून उद्या सोमवार, 22 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत लसीकरणाचे ‘मिशन इंद्रधनुष्य’ राबविण्यात येणार आहे. यामध्ये जन्मल्यानंतर अनिवार्य असणारी, मात्र आतापर्यंत न दिलेल्या पोलिओ, गोवरसारख्या अनेक आजारांसह बीसीजी, रोटा व्हायरस, ओपीव्ही, ‘एमआर’ अशा लसी देण्यात येणार आहेत. यामध्ये शून्य ते 2 वर्षे वयोगटातील मुले आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून पहिल्या दोन वर्षांत बालकांचे लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे त्यांना शक्य होते. अर्धवट लसीकरण झालेले व लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात. या पार्श्वभूमीवर 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लसीकरण मोहीम ऑक्टोबर 2017 पासून ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ या नावाने सुरू केली आहे. याअंतर्गत पालिका क्षेत्रातदेखील 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021 दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. आपल्या देशात बालमृत्यू व प्रसूतीदरम्यान होणाऱया मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास या लसीकरणामुळे मदत होणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
- केंद्र शासनाने ‘मिशन इंद्रधनुष्य’ कार्यक्रमांतर्गत मुंबईत आतापर्यंत चार मोहिमा यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. 2021 मध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात राबविण्यात येणार आहे.
- ही मोहीम दोन फेऱयांमध्ये राबविण्यात येणार असून पहिली फेरी फेब्रुवारी महिन्यात तर दुसरी फेरी मार्च महिन्यात होणार आहे. या कालावधीत पालिका आरोग्य केंद्रांतर्फे शहरी भागातील झोपडपट्टी, बांधकामे, अतिदुर्गम भाग किंवा डोंगराळ भाग, लसीकरणाचे काम असणारे भाग इत्यादी जोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.


























































