स्वॅब टेस्ट नाही… 700 रुपयांत निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट, सायबर कॅफेचालकाचा गोरखधंदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

700 रुपयांत बनावट निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट देणाऱया एका सायबर कॅफे चालकाचा काळाबाजार गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने उद्ध्वस्त केला. कुठलीही टेस्ट न करता अशा प्रकारे अनेकांना त्याने निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दिला असल्याचा संशय असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

जे.जे. मार्ग येथे असलेल्या अझारी नेट कॅफे येथे बनावट निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट सर्रास विकले जात असल्याची खबर युनिट-1ला मिळाली. त्याआधारे प्रभारी निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांच्यासह पथकाने त्या कॅफेत एका व्यक्तीला पाठवून त्याला बोगस निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट मिळविण्यास सांगितले. त्यानुसार 700 रुपये मोजून त्या व्यक्तीने कुठलीही स्वॅब टेस्ट न करता कॅफे चालक मोहम्मद शरीफ खान (38) याच्याकडून लाईफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड या लॅबचे बोगस निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट मिळवला. त्या वेळी पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. त्यामुळे खान निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट देताना रंगेहाथ सापडला. त्या सायबर कॅफेत पोलिसांना संगणक, कलर प्रिंटर, 25 हजारची रोकड सापडली. अधिक तपासाकरिता या गुह्याचा तपास जे. जे. मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.