
प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी अंधेरी परिसरात घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर उपचार सुरू आहेत. हल्ल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रियकराला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणी ही अंधेरीच्या साकीनाका परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी तिची अटक आरोपीसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. अटक आरोपी हा तरुणीला लग्नाबाबत विचारणा करत असायचा. शनिवारी सायंकाळी तरुणी ही कामावरून सुटून घरी जात होती तेव्हा अटक आरोपीने तिचा पाठलाग केला. कृष्णानगर पाइपलाइनजवळील परिसरात आरोपीने तरुणीला थांबवले व त्याने तिचा जबरदस्तीने हात पकडला. त्यानंतर अटक आरोपीने तरुणीच्या पोटात चाकू मारला. चाकूहल्ल्यात ती जखमी झाली. याची माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी तिला उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकू हल्लाप्रकरणी पोलिसांनी अटक आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.
पतीने केली पत्नीची हत्या
कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. कविता नारण चौधरी असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


























































