
मॅनेजरने मालाड येथील ब्रँचमध्ये पोहचविण्यासाठी दिलेली दहा लाखांची रोकड घेऊन कंपनीचा टेम्पो चालक यूपीतल्या आपल्या गावी पळून गेला. पण सांताक्रुझ पोलिसांनी झटपट तपास हाती घेत त्या टेम्पोचालकाला 36 तासांच्या आत ताब्यात घेऊन 10 लाखांची रोकड हस्तगत केली.
पायधुणी येथे बीएनएल एक्सप्रेस कार्गो प्रा.लि. कंपनी आहे. या कंपनीत विजय यादव हे पार्सल डिलिव्हरी तर पप्पू अवस्थी टेम्पोचालकाचे काम करतो. 19 तारखेला कंपनीच्या मॅनेजरने विजय यांना मालाड ब्रँचमध्ये दहा लाख रुपये पोहचविण्यासाठी दिले होते. दरम्यान, सांताक्रुझ येथील आशा पारेख हॉस्पिटल सिग्नल येथील वर्ल्ड टाइम घडाळाच्या दुकानासमोर पार्सल देण्यासाठी विजय टेम्पोतून खाली उतरले. हीच संधी साधून पप्पू अवस्थी विजय यांनी टेम्पोत ठेवलेली दहा लाखांची रोकड घेऊन पळ काढला. पप्पू आणि रोकड टेम्पोत नसल्याचे लक्षात येताच विजय यादव यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष कणसे, अंमलदार गणेश शिवगण, वैभव सावंत यांनी पप्पू अवस्थीचा शोध सुरू केला. तेव्हा पप्पू हा उत्तर प्रदेशातील त्याच्या पंचनपुरा येथील गावी पळून गेल्याचे निष्पन्न झाले.




























































