साकीनाका हत्याकांड देवाणघेवाणीच्या वादातून, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका हत्याकांडातील पीडित महिला आणि आरोपी मोहन चौहान हे एकमेकांना ओळखत होते. घटनेपूर्वी दोघे चार-पाच वेळा भेटले होते. त्यांच्यात देवाणघेवाण होत होती. पीडित महिला चौहानकडे काही मागणी करीत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि चौहानने महिलेसोबत अमानुष कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. ती महिला अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील असल्याने चौहानविरोधात अॅट्रॉसिटीचे कलमदेखील लावण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज सांगितले.

साकीनाका येथील रशीद कंपाऊंडमध्ये शुक्रवारी पहाटेच्या वेळी मोहनने केलेल्या अमानुष मारहाणीत ती महिला गंभीर जखमी झाली होती. राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. चौहानने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने गुह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आल्याचे आयुक्त नगराळे यांनी सांगितले.

येत्या 15-20 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल. परंतु डीएनए तपास करायचा असल्याने त्यासाठी थोडा वेळ लागेल. डीएनए रिपोर्ट लवकर उपलब्ध झाला तर महिनाभराच्या आत आम्ही आरोपपत्र दाखल करू, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

गस्त वाढवा; आयुक्तांच्या सूचना

  • नियंत्रण कक्षाने महिलांच्या बाबतीतील कॉलवर तत्काळ कारवाई करावी.
  • अंधाराची ठिकाणे, महिला प्रसाधनगृहे तसेच निर्जनस्थळी बीट मार्शल, पेट्रोलिंग वाहनांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी.
  • संशयास्पद व्यक्तींची चौकशी करावी.
  • रात्रीच्या वेळी एकटी महिला आढळून आल्यास तिला आवश्यक ती मदत द्यावी.
  • विनयभंग, बलात्कार, अपहरण या गुह्यात अटक झालेल्या आरोपींचे स्वतंत्र रेकॉर्ड बनवून त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
  • बेवारस वाहने ताब्यात घेऊन कारवाई करावी.
  • रेल्वे स्थानके तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतात त्या ठिकाणी पोलीस व्हॅन तैनात ठेवावी.