ऑनलाइन दारू मागवणे पडले महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीसाठी ऑनलाइनवरून दारू मागवणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन दारूच्या नावाखाली ठगाने महिलेची 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार या पतीसोबत मालाड परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात त्या पतीसाठी ऑनलाइन दारू मागवत होत्या. ऑनलाइन दारूच्या ऑर्डरसाठी त्यानी सर्च इंजिनवर जाऊन मालाड येथील वाईन शॉपचा नंबर शोधला. त्या नंबरवर महिलेने फोन करून दारूची ऑर्डर केली. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्या दारूसाठी 1750 रुपये ई-वॉलेटवरून भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने पैसे ई-वॉलेटवरून भरले. फोन करणाऱ्या व्यक्तीने महिलेला फोनवर एक क्यूआर कोड पाठवला. तो क्यूआर हा जीएसटी बिलासाठी आहे. जोपर्यंत क्यूआर कोड स्पॅन करत नाही तोपर्यंत बिल तयार होणार नाही अशा भूलथापा महिलेला मारल्या. त्यावर विश्वास ठेवून महिलेने तो क्यूआर कोड स्पॅन केला.

क्यूआर कोड स्पॅन केल्यावर महिलेच्या खात्यातून सुरुवातीला 19 हजार 965 रुपये काढले गेले. खात्यातून पैसे गेल्यावर महिलेने त्या नंबरवर फोन करून पैसे का गेले असा जाब विचारला. तेव्हा समोरील व्यक्तीने ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील. पैसे परत होण्यासाठी एक क्यूआर कोड पाठवत महिलेच्या खात्यात 10 रुपये जमा केले. त्यानंतर महिलेला फोनवर गुंतवत ठगाने तिच्या खात्यातून 81 हजार 210 रुपये पुन्हा काढले. पैसे काढल्याचे लक्षात येताच महिलेने पुन्हा त्याला जाब विचारला. तेव्हा त्या ठगाने ते पैसे तुमच्या खात्यात लवकर जमा होतील. सध्या ते पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अन्य जणांचे खाते द्या, त्यात पैसे जमा होतील असे महिलेला सांगण्यात आले. ठगाने बोलण्यात व्यस्त ठेवत पुन्हा 79 हजार रुपये काढले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.