Video- मुंबईच्या डबेवाल्यांचाही ‘चलो अयोध्या’चा नारा, राम मंदिरासाठी शिवसेनेला जाहीर पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्यासाठी ‘चलो अयोध्या’चा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू समाजात जणू चैतन्याची लाट उसळली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. राम मंदिर निर्माणाच्या मागणीवरून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईचे डबेवालेही 25 नोव्हेंबरला त्यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहेत. डबेवाल्यांच्या अडीअडचणीच्या काळात शिवसेना नेहमीच डबेवाल्यांच्या पाठीशी उभी रहात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला अयोध्येच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचा निर्णय मुंबई डबेवाला असोशिएशने घेतला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा देण्यासाठी वारकरी, साधु-महंत तसेच अनेक संघटना अयोध्येला जाणार आहेत. तसेच मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वात डबेवाल्यांचे एक शिष्टमंडळ अयोध्येला जाणार आहे. यामध्ये सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, कैलाश शिंदे, आनंथा तळेकर यांच्यासह अनेक डबेवाल्यांचा समावेश असेल. दरम्यान, डबेवाल्यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे डबेपोहोचवण्याच्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही. डबेपोहोचवण्याची सेवा नेहमी प्रमाणे सुरू राहणार असल्याचे सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे.