
सामना प्रतिनिधी। मुंबई
लोकलमधून पडून, रूळ क्रॉस करताना होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेने योजलेल्या उपायांना हळूहळू यश येत आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या उपनगरीय हद्दीत 244 मृत्यू झाले असून याच चार महिन्यांत 2017 मध्ये 293 जणांचा मृत्यू झाला. म्हणजे अपघाती मृत्यूत 16 टक्क्यांनी घट झाली आहे.
दररोज मुंबईत सरासरी 10 ते 12 जणांचा लोकल ट्रेन अपघातांत मृत्यू होत असतो. उपनगरीय लोकलच्या तिन्ही मार्गांवर मिळून दरवर्षी एकूण तीन ते साडेतीन हजार जणांचा मृत्यू तर तेवढेच जण जखमी होत असत. गेल्या दोन वर्षांत ही आकडेवारी दोन हजारांवर आली आहे. गेल्या वर्षी 2018 मध्ये 2 हजार 981 जणांचा लोकल अपघातात मृत्यू झाला होता. आता हे प्रमाण थोडे घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आता दररोज सरासरी 8 ते 9 प्रवाशांचा मृत्यू होतात.
मध्य रेल्वेने आरपीएफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 2017 मध्ये 293 जणांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये याच चार महिन्यांत 271 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 2019 मध्ये याच चार महिन्यांत 244 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कल्याण, ठाणे, कुर्ला, शीव-माटुंगा, सॅण्डहर्स्ट रोड आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या भागांत सर्वाधिक मृत्यू होत असतात. विक्रोळी ते कांजुरमार्ग, घाटकोपर-विक्रोळी, शीव-कुर्ला, मुलुंड ते ठाणे, भांडुप ते नाहूर या भागांत प्रवासी जीव धोक्यात घालून सर्वाधिक रूळ ओलांडत असतात. तर हार्बर मस्जिद ते सॅण्डहर्स्ट रोड, चेंबूर ते गोवंडी, मानखुर्द, वडाळा या भागांत रेल्वेचे रूळ ओलांडण्याचे प्रमाण मोठे असून गेल्या काही वर्षांत अनेक भागांत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मदतीने रेल्वेने पादचारी पुलांची उभारणी केली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविली. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याद्वारे समाजमाध्यमांवर जनप्रबोधन केले. तसेच असे धोकादायक स्पॉट शोधून त्यावर भिंत उभारणे, चोरवाटा बंद करणे असे उपाय योजल्याने अपघातांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जपसंर्क अधिकारी, ए. के. जैन यांनी सांगितले.
तटबंदी उभारण्याचे काम वेगाने
रूळ ओलांडण्याची प्रवाशांना वेळ येऊ नये यासाठी मध्य रेल्वेने गेली काही वर्षे रेल्वे रुळांच्या कडेला मजबूत तटबंदी उभारली तर काही ठिकाणी लोखंडी तारांचे कुंपण उभारले. मध्य रेल्वेवर एकूण 156 कि.मी.चा रेल्वे मार्ग असून त्यापैकी 23 कि.मी.च्या भाग खाडीचा असल्याने येथे भिंत उभारणे अशक्य असून इतर 133 कि.मी.च्या रेल्वे मार्गावर तटबंदी उभारण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. त्यापैकी 103 कि.मी.ची तटबंदी बांधून पूर्ण झाली आहे.

























































