
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई आणि दिल्लीतील रहिवासी सध्या हैराण झाले आहेत. नवी दिल्लीतील 60 टक्के रहिवासी आणि मुंबईकर वाढत्या प्रदूषणाला पंटाळून अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या रहिवाशांनी दूषित हवेची तक्रार केली असून या शहरांतील 10 पैकी 6 रहिवासी अन्य शहरांत स्थलांतर करण्याचा विचार करीत आहेत, असे या रहिवाशांनी एका सर्व्हेत आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे.
प्रिस्टन केअर या हेल्थ केअर प्रोव्हाईडरच्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. मुंबई आणि दिल्लीतील आजूबाजूच्या भागातील जवळपास 4 हजार लोकांनी या सर्व्हेत सहभाग घेतला. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक लोकांना खोकला येत आहे, श्वास घेण्यास अडचण येत आहे, घसा खवखवत आहे, डोळय़ांची जळजळ होत आहे, अशी लक्षणे आढळत आहेत, असे 10 पैकी 9 लोकांनी म्हटले आहे.






















































