दिव्यांगांच्या आयुष्याची वीण घट्ट करतेय पैठणी, हाताला काम, डोक्यावर छत आणि मायेची ऊब…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठणी म्हणजे महाराष्ट्राचे महावस्त्र! पैठणी म्हणजे साडय़ांची राणी! पदरावरचे सोनेरी मोर, आकर्षक रंगसंगती आणि वैशिष्टय़पूर्ण काठ ही पैठणीची ओळख! यासाठीच येवले येथील कापसे पैठणी जगप्रसिद्ध आहे. या कापसे पैठणीच्या निर्मितीत दिव्यांगांचे हात लागले आहेत. कापसे फाऊंंडेशनतर्फे दिव्यांगाना हातमागावर पैठणी विणण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेत. त्यातून दिव्यांगाना रोजगार मिळत आहे, राहायला घर मिळत आहे. दिव्यांगांच्या आयुष्याची वीण घट्ट करणाऱया या उपक्रमाचे जगभरात काैतुक होत आहे.

कापसे पैठणी आणि कापसे फाऊंडेशनचे संचालक बाळकृष्ण कापसे यांच्या संकल्पनेतून दिव्यांगाना हातमागावर पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आज असे अनेक दिव्यांग आहेत, ज्यांना गरज असूनही रोजगार मिळत नाही. अशांचा शोध घेऊन त्यांना पैठणी बनविण्याचे प्रशिक्षण कापसे फाउंडेशनच्या वतीने वडगाव येथे दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत निवासापासून जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था फाउंडेशनच्या वतीने केली जाते. तसेच त्यांच्यासाठी घरे बांधण्यात आली आहेत. असे 100 फ्लॅट्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक दिव्यांगाला स्वतंत्र हातमाग उपलब्ध करून दिला जात आहे. त्यांच्या नाश्ता, जेवण्याची सोयदेखील फाऊंडेशनच्यावतीने केली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण स्वतंत्रपणे पैठणी तयार करण्याचे काम करत असून त्यातून हजारोंची कमाई करत आहे. विवाहानंतरही ते सहकुटुंब फाऊंडेशनच्या फ्लॅट्समध्ये राहू शकतात.

दिव्यांगांनी संपर्क साधावा

बाळकृष्ण कापसे यांनी दिव्यांगांसाठी बांधलेल्या प्रशिक्षण केंद्रांची तसेच निवासस्थानांची क्षमता 300 पर्यंत आहे. त्यातुलनेने सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या दिव्यांगांची संख्या कमी आहे. त्यामुळे कापसे फाऊंडेशनने राज्यभरातील दिव्यांगांना आवाहन केले आहे. ज्यांना पैठणी निर्मितीचे काwशल्य शिकायचे आहे आणि कायमस्वरूपी रोजगार मिळवायचा आहे, त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एका हातमागावर सुरू केला होता व्यवसाय

बाळकृष्ण कापसे यांनी 2001 साली एका हातमागापासून हा उद्योग सुरू केला. पुरेशी जागा नाही, भांडवल नाही अशा अनेक अडचणींना तोंड देत नेटाने पैठणींची निर्मिती सुरू ठेवली. अवघ्या 10 वर्षांत कापसे पैठणीचा ब्रॅण्ड तयार केला. आज मुंबई, पुण्यातूनच नव्हे तर हैदराबाद, जयपूर, कोलकाता, चेन्नई, नागपूर अशा अनेक शहरांतून तसेच परदेशातूनही कापसे पैठणीला मोठी मागणी आहे. त्यातून 600 ते 700 लोकांना रोजगार मिळत आहे. ब्रॅण्डचे नाव झाल्यावर आणि हातात थोडी रक्कम शिल्लक राहिल्यावर सामाजिक जाणीवेतून बाळकृष्ण कापसे यांनी वडगाव येथील मूळ 8 एकर जमिनीला लागून 50 एकर जमीन घेतली. आणि तिथे 100 फ्लॅट्स बांधण्याचे काम सुरू केले. तसेच प्रशिक्षण केंद्र उभारले. 2013 साली सुरू झालेल्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मुलांना ट्रेनिंग देण्यात आले. कारागिरांच्या शेजारी बसवून शिकवण्यात आले. हातमाग म्हणजे काय, रेशीम काम कसे करायचे या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात झाली. सद्यस्थितीत 36 दिव्यांग पैठणी तयार करून रोजगार मिळवत आहेत.

…तर मोठी रोजगार निर्मिती होईल

पैठणी हे खरं तर महाराष्ट्राचे वस्त्रवैभव. मात्र महाराष्ट्र या व्यवसायात कुठे तरी मागे पडतोय याची खंत बाळकृष्ण कापसे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात केवळ 10 टक्के पैठणी तयार होतात. तर उरलेल्या दक्षिणेकडील राज्यांत तयार होतात. पैठणी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. तसेच वडगावसारखे काैशल्य प्रशिक्षण केंद्र हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, असे कापसे म्हणाले.