रिक्षाचालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच नेली रिक्षा, कुर्ला स्थानकावर ‘धतींग’ करणाऱ्या चालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅटफॉर्मला रेल्वे नाही तर चक्क रिक्षा आल्याचे तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना. पण रिक्षाचालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच रिक्षा नेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याने प्रवासीही अचंबित झाले. मात्र काही सजग नागरिकांनी रिक्षाचालकाला याचा जाब विचारला आणि त्याला प्लॅटफॉर्मवरून बाहेर जाण्यास भाग पाडले. हा प्रकार प्लॅटफॉर्मवर उपस्थित काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रितही केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ 12 ऑक्टोबरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुर्ला स्थानकावर पहाटे 1 वाजेच्या सुमारास पश्चिम दिशेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अचानक एक रिक्षा घुसली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याचे पाहून प्रवासी चांगलेच गोंधळले. त्यानंतर उपस्थित प्रवाशांनी आरओरडा करताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी प्लॅटफॉर्मवरून रिक्षा बाहेर काढली आणि रिक्षाचालकाला अटक केली.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रेल्वे आणि आरपीएफला काहींनी टॅग केले आहे. यानंतर आरपीएफने ट्विट करत या घटनेची माहिती दिली. 12 ऑक्टोबरचा हा व्हिडीओ असून सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी रिक्षा जप्त करत चालकाला अटक केली. रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिथे त्याला दंड ठोठावण्यात आला.