अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना फॉरेनचे ट्रेनिंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विदेशात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. याशिवाय ठाकूर व्हिलेज येथील अग्निशमन केंद्रात ड्रील टॉवर कम मल्डी ऑक्टिव्हिटी सिम्युलेटर उभारले जाणार असून जवान-अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हायटेक’ प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत आगी लागून झालेल्या जीवित-वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला अग्निशमन दलाची श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज पालिका प्रशासनाने अग्निशमन दलात आगामी काळात करण्यात येणाऱया सुधारणांची माहिती सादर केली. यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना विदेशात प्रशिक्षणाकरिता पाठवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय 2019-2020 या आर्थिक वर्षामध्ये ड्रील टॉवर कम मल्टी ऑक्टिव्हिटी सिम्युलेटरची उभारणी ठाकूर व्हिलेज अग्निमशन केंद्र येथे करण्यात येणार आहे. या ठिकाणी अग्निशामक जवानांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी हॉट फायर ट्रेनिंग, व्हर्टिकल रेस्क्यू, कन्फाईड सर्च ऍण्ड रेस्क्यू, रोप रेस्क्यू आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विभागवार पाणी भरणा केंद्रे वाढवणार
आग लागल्याच्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता सहज व्हावी यासाठी पालिका क्षेत्रातील पाणी भरणा केंद्रांची संयुक्त तपासणी करून मुंबई अग्निशमन दलासाठी सध्या उपलब्ध असणाऱया 26 केंद्रांमध्ये विभागवार वाढ करण्यात येणार आहे. याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. याशिवाय तीन नवीन पाणी वाहन वाहने खरेदी करण्यात येणार आहे.

जनजागृतीसाठी ‘बिग-बी’ मैदानात
आगीच्या अनेक दुर्घटनांमध्ये झालेली जीवित-वित्तहानी ही संबंधित सोसायटय़ा, आस्थापनांनी आगप्रतिबंधक यंत्रणा उभारण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांना अग्निशमन केंद्रांवर आणि गृहनिर्माण संस्था, उत्तुंग इमारती संकुल, शाळा, रुग्णालये आदी ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही जनजागृती प्रभावीपणे करण्यासाठी ‘बिग- बी’ अमिताभ बच्चन, रणदीप हुड्डा यांनादेखील सहभागी करून घेण्यात येत आहे.

अशा होणार नव्या सुधारणा

  • सहायक आयुक्तांकडून बचावकार्यात अडथळा ठरणाऱया अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याचे आदेश.
  • दाटीवाटीच्या वस्तीत सहज पोहचून बचावकार्य करण्यासाठी फायर बाईक घेणार.
  • बचावकार्यासाठी अत्याधुनिक हॅजमॅट वाहनांची खरेदी. n जनजागृतीसाठी हेल्पलाइन सुरू करणार.