
सामना प्रतिनिधी। मुंबई
मोकळ्या नाल्यांमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि रोगराई टाळण्यासाठी मुंबईतील झोपडपट्टय़ा, शाळा-कॉलेजजवळील नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत. यात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम असलेल्या नाल्यांवर कमानीच्या आकाराची आच्छादने टाकली जाणार आहेत. याबाबत लवकरच विशेष धोरण आणले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी स्थायी समितीत दिली.
मुंबईत झोपडपट्टीच्या बाजूला असणाऱया शेकडो नाल्यांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय उघडय़ा नाल्यांमध्ये रहिवाशांकडून थेट कचरा टाकण्याचे प्रकारही घडतात. तर काही वेळा शाळा-कॉलेज, झोपडपट्टय़ांजवळील नाल्यांमध्ये मुले, रहिवासी पडल्याने जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नाले आच्छादनांनी बंदिस्त करण्याचे धोरण प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान, दहिसर पूर्व येथील वसंत हिला सोसायटीजवळील व्ही.एच. देसाई नाला, शीव टेकडीजवळील संभाजी नगर नाला, बोरिवली पूर्व येथील काजूपाडा कॉसमॉस नाला आणि बोरडे रोडजवळील पालिका उद्यानातून जाणाऱया नाल्यांवर आच्छादने टाकण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला. मात्र पालिकेच्या या प्रस्तावावर अनेक नगरसेवकांनी आक्षेप घेत केवळ एकाच विभागात हे काम न करता सर्व विभागांमध्ये नाले आच्छादित करण्यासाठी खास धोरण आणावे, अशी मागणी लावून धरण्यात आली.
…त्यानंतरच नवीन प्रस्ताव आणणार
या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण करावे, असे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी संबंधित प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगत नाल्यांच्या आच्छादनाबाबत खास धोरण तयार करून त्यानंतरच प्रस्ताव आणू, असे आश्वासन स्थायी समितीत दिले.
संपूर्ण मुंबईत धोरण राबवा
नाल्यांवर आच्छादने टाकल्यामुळे रोगराई, दुर्गंधीला आळा बसणार असल्याचे शिवसेनेचे संजय घाडी म्हणाले. तर शाळा-कॉलेज नव्हे तर मुंबईतील सर्व नाले आच्छादित करण्याची सूचना शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी केली. या वेळी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे गटनेते मनोज कोटक, प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख यांनीदेखील मुंबईतील नाल्यांवर आच्छादने टाकण्याबाबत खास धोरण तयार करण्याची मागणी केली.


























































