रहिवाशांनी घरीच केले गौरी-गणपतींचे विसर्जन, सातरस्तामधील ‘हेरंब हाइट्स’ने ठेवला आदर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गौरी- गणपतींचे विसर्जन घरच्या घरी करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सातरस्तामधील ‘हेरंब हाइट्स’ या इमारतीच्या रहिवाशांनी त्यांच्या सर्व गौरी-गणपतींचे विसर्जन सोसायटीमधील कुंडात केले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचे कौतुक केले असून याचा आदर्श इतर सोसायटी, रहिवाशांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जन 70 नैसर्गिक चौपाटय़ा आणि तलावांवर करण्यास बंदी घातली आहे. त्याला पर्याय म्हणून फिरते कृत्रिम तलाव आणि मैदान, मोठय़ा आवारात 170 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. आगमन आणि विसर्जनावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही उपाययोजना आखली आहे. त्याचबरोबर ज्यांना शक्य होईल त्यांनी घरच्या घरीच गणपतींचे विसर्जन करावे, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांनी रहिवाशांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन सातरस्ता विभागातील हेरंब हाइट्समधील रहिवाशांनी आपल्या गौरी– गणपतीचे विसर्जन सोसायटीमधील कुंडामध्ये करून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, हेरंब हाइट्समधील रहिवाशांनी इतरांसमोर आदर्श उदाहरण घालून दिले असून इतर सोसायटींनी अशा प्रकारे घरच्या घरी किंवा सोसायटीत विसर्जन करून मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.