रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका! अपघाती मृत्यू रोखण्यासाठी जीआरपीकडून जनजागृती मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) विशेष जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका. एक लोकल चुकल्याची चिंता नको, लगेच दुसरी लोकल येईल. पण जीवाशी खेळू नका, असे आवाहन करीत लोहमार्ग पोलीस विविध रेल्वे स्थानकांच्या आवारात जनजागृती मोहीम राबवत आहे. याच अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील माहीम रेल्वे स्थानकात ‘जीवन रक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम’ पार पडला.

उपनगरी रेल्वे मार्गावर अजूनही अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. रोज सरासरी 6 मृत्यूची नोंद होत आहे. हे मृत्यूचे सत्र थांबवण्यासाठी आता लोहमार्ग पोलिसांनी प्रभावी मोहिमा राबवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे प्रवासातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. माहीम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या जवळील भागात ‘जीवनरक्षा अभियान’ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. टी. कुंभार, माहीम स्टेशन मास्तर अमोल चंदन तसेच इतर पोलीस अधिकारी, होमगार्ड, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी मोहिमेत सहभाग घेतला. महालक्ष्मी येथील लाला लजपतरॉय महाविद्यालयाचे विद्यार्थीही अभियानात सहभागी झाले होते. विद्यार्थी, स्वयंसेवकांनी रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. काही भागांत रेल्वे प्रवासी लोकल पकडण्याच्या घाईत रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आहे आहे. त्याच अनुषंगाने अपघात रोखण्याच्या हेतूने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मानव साखळी तयार केली. ही जनजागृती मोहीम विविध स्थानकांत राबवली जाईल.