
सामना प्रतिनिधी । मुंबई
सूर्य आग ओकतोय. आभाळाची भट्टी तापली आहे. प्रचंड उष्णतेने जमिनीतले पाणी सुकून गेले आहे. धरणी रखरखीत झाली आहे. विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. माणसांना, गुराढोरांना प्यायला पाणी नाही. महाराष्ट्र नुसता तापलाच नाही तर संतापलाही आहे. पाण्याच्या थेंबासाठी माणसांची जीवघेणी धडपड सुरू आहे. पाऊस वेळेवर पडला नाही तर काही दिवसांत ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अवघे जीवन पाण्याअभावी ठप्प झाले आहे.
महाराष्ट्रात तापमानाचा पारा सतत चढताच आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये प्यायलाही पाणी नाही. अवघ्या महाराष्ट्राचीच पाण्यासाठी दाही दिशा सुरू आहे.
युद्ध आमुचे सुरू…एका मिनिटात दहा हजार लिटर पाण्याचा उपसा
अर्ध्याहून जास्त हिंदुस्थानचा दाह
जगभर उष्णतेची लाट उसळली असून हिंदुस्थानचाही किमान दोनतृतीयांश भाग तापला आहे. राजस्थानमधील चुरू शहरात 63 वर्षांतील दुसरे सर्वाधिक तापमान होते. तेथे शनिवारी तापमानाने 50.8 हा आकडा पार केला होता. पुढील दोन दिवस हा उकाडा कायमच राहणार आहे.
पाऊस 6 जूनला केरळात येणार
हवामान खात्याला ‘पाऊस कधी येणार’ असे विचारले, तर त्यांचे तारीख पे तारीख सुरूच आहे. आता म्हणतात 6 जूनला पाऊस केरळात येणार. म्हणजे नंतर आठवडय़ाने तो कोकणात, मग हळूहळू मुंबईसह महाराष्ट्रात जाणार. तारखेचे गणित जुळवले तर आभाळातून नाही, डोळय़ांतून पाणी येते!
मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हय़ात पाणीटंचाई आणि दुष्काळाने हाहाकार उडवला आहे. मराठवाडा तहानेने व्याकुळला आहे. अशा परिस्थितीत टँकरने आणून टाकलेले पाणी आपापल्या ड्रममध्ये भरून घेण्यासाठी युद्धात उतरलेल्या रणरागिणीप्रमाणे महिला पाण्यावर तुटून पडतात. केवळ एका मिनिटात हे टँकरभर पाणी उपसले जाते.




























































