प्रीती राठी ऑसिड हल्ला प्रकरण; आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रीती राठी ऑसिड हल्लाप्रकरणी आरोपी अंकुर पनवार याला मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा दिलासा मिळाला. आरोपी पनवार याला सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने रद्द केली. फाशीची शिक्षा रद्द करतानाच न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ऑसिड हल्ल्याप्रकरणी एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला हा देशातील पहिलाच खटला होता.

नौदलाच्या रुग्णालयात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी हरयाणाची प्रीती राठी दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली. गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती कुटुंबीयांसमवेत उतरत असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावर जवळून ऑसिड फेकले. शर्थीचे प्रयत्न करूनही प्रीतीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी पनवार याला सप्टेंबर 2016 साली फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम करण्यात यावी यासाठी सरकारच्या वतीने हायकोर्टात अर्ज करण्यात आला. याला आरोपी पनवार याने आव्हान दिले होते. या खटल्यावरील सुनावणी बुधवारी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या दालनात घेण्यात आली. कलम 302 आणि कलम 326 (ब) चा विचार करता आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करण्यात येत असून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले व याचिका निकाली काढली.

आपली प्रतिक्रिया द्या