
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी दर रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या, रविवारी तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. तर पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेतला जाणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान रात्रकालीन (मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.40 या वेळेत) ब्लॉक घेतला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.





























































