
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब असला तरी पावसाळी आजारांचा धोका मात्र कायम आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत मलेरिया -482, डेंग्यू – 213, गॅस्ट्रो -193 आणि चिकनगुनियाचे 30 रुग्ण नोंदवले गेले आहेत. यामध्ये सुदैवाने एकही मृत्यू झाला नसला तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली नसल्याचे पालिका सांगत असली तरी सध्या अजूनही दररोज सुमारे 300हून जास्त रुग्णांची नोंद होत आहे. असे असताना पावसाळी आजारही अजून ठाण मांडून असल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. यामध्ये सप्टेंबरमध्ये मलेरियाचे एकूण 607 रुग्ण आढळले होते. ही वाढ कायम असून 21 ऑक्टोबरपर्यंत 482 रुग्ण आढळले आहेत. मात्र लेप्टो रुग्णांची संख्या 46वरून 29वर खाली आली असून तर हिपेटायटीस रुग्णसंख्या 28वरून 30 इतकी झाली आहे. दरम्यान, पावसाळी आजारांचे संकट अजून असल्यामुळे पालिकेने प्रमुख 4 रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांत या आजारांवर उपचारासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पाणी जास्त दिवस साचू देऊ नये आणि घर-परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लेप्टो, डेंग्यूचे 7 बळी
21 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत मलेरियाचे एकूण 4485 रुग्ण, लेप्टोचे 208, डेंग्यूचे 689, गॅस्ट्रो 2310, हिपेटायटीस 223, चिकनगुनिया 45 आणि ‘एच1एन1’चे 61 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आतापर्यंत लेप्टोमुळे 4 तर डेंग्यूमुळे 3 जणांचा मृत्यू झाला.
अशी आहे रुग्णसंख्या
आजार सप्टेंबर 21 ऑक्टोबरपर्यंत
मलेरिया 607 482
लेप्टो 46 29
डेंग्यू 258 213
गॅस्ट्रो 245 193
हिपेटायटीस 28 30
चिकनगुनिया 7 30
एच1एन1 9 6































































