पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. त्याची कन्या सना हीने त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. अजीज कोलकाताला येथे गेले होते. मंगळवारी ते मुंबईत आले. मात्र विमानतळावरच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अजीज यांचा जन्म १९५४ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. अजीज यांनी हिंदी बरोबरच बंगाली, उडीया व अनेक प्रांतीय चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते. त्यांच्या सुरेल आवाजाचे अनेक चाहते होते. ज्येष्ठ दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचे ते चाहते होते. त्यांना संगितकार अनु मलिक यांनी बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला होता. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मर्द या चित्रपटातील “मैं हूं मर्द तांगे वाला”हे गाणे अजीज यांनी गायले होते. या गाण्याने एका रात्रीत अजीज यांना पार्श्वगायनातील सुपस्टार बनवले होते. त्यानंतर अजीज यांनी अनेक हीट गाणी दिली. त्यातील लाल दुपट्टा मलमल का, मैं से मीना से न साकी से यासारखी शेकडो गाणी हिट झाली होती. अजीज यांनी मर्द चित्रपटाबरोबरच बंजारन, आदमी खिलौना है, लव 86, पापी देवता, जुल्म को जला दूंगा, पत्थर के इन्सान, बीवी हो तो ऐसी, बरसात की रात या चित्रपटात गाणी गायली होती.

लता दीदींनी वाहिली श्रध्दांजली

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून अझीज यांना श्रद्धांजली वाहिली. मोहम्मद अझीज हे अतिशय गुणी गायक होते तसेच खूप चांगले व्यक्ती होते. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी श्रध्दांजली त्यांनी वाहिली.